कारवी : रानफुलांमधील अत्यंत देखणी वनस्पती
सह्याद्रीत वाढणाऱ्या रानफुलांमधील एक अत्यंत देखणी वनस्पती आहे कारवी. सह्याद्रीत सर्वत्र व्यापून राहिलेल्या कारवीच्या प्रजाती (गटामध्ये) मध्ये कारवी Carvia Callosa, माळकारवी, वायटी, टोपली कारवी, सुपुष्पा अशा अनेक वनस्पतीचा समोवश होतो. या सर्व गटातील वनस्पतीचं वेगळेपण म्हणजे त्यांना दरवर्षी फुलं न येणं. या गटातील कारवी वनस्पती तुम्हाआम्हाला परिचीत असते ती वृत्तपत्रांमधील बातम्यांमुळे. सह्याद्रीतल्या आर्द्र पानझडी वनाचे प्रदेश, गडकिल्ल्यांचे उतार व्यापून राहिलेली ही वनस्पती आहे. निळसर जांभळ्या फुलांमुळं ही वनस्पती एकदा फुलली की हे सारे उतार निळे-जांभळे करून टाकते. पण त्याच्या फुलण्याची एक वेगळीच तऱ्हा आहे.
कारवीची बी रुजल्यानंतर तब्बल सात वर्ष या झुडूपाला फुले येतच नाहीत. दरवर्षी पावसाळ्यात पानं येतात हिवाळ्यानंतर ती झडूनही जातात पण फुलं मात्र अवतरत नाहीत. या दरम्यान अन्न तयार करणं आणि खोडामध्ये साठवणं चालूच राहतं. सात वर्षानंतर म्हणजे मागच्या फुलण्यानंतर आठ वर्षांनी हे झाड फुलून येतं आणि याचं फुलणंही एकटंदुकटं नव्हे तर त्या प्रदेशातील सारी झुडपं एकदम फुलांनी डवरतात.
कारवीचा दक्षिणेकडचा भाऊबंद म्हणजे निलगिरी पर्वतात फुलणारी कुरुंजी. कुरुंजी सुद्धा फुलते बारा वर्षांनी. एकदा फुलली की मग सारे उतार निळे-जांभळे होतात अन् त्यामुळेच पर्वतरांगेचं नाव झालं निलगिरी- निळा डोंगर. कुरुंजी इतक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याकडची कारवी फुलते अन् एकदा फुलली की मकरंद गोळा करण्यासाठी मधमाशांची अन् इतर किटकांची अशी काही झुम्मड उडते की ते इतर वनस्पतींकडे ढुंकूनही बघत नाहीत. त्यामुळे त्या काळात गोळा झालेला बराच सारा मध हा कारवीतल्याच मकरंदापासूनचा असतो. महाबळेश्वर सारख्या गिरीस्थानी हा मध मोठ्या प्रमाणात विकलाही जातो. एकदा फुलं येऊन गेल्यावर कारवीचे झुडूप मरून जाते. नवीन वर्षाचा पाऊस आला की तडतड करून कारवीच्या साऱ्या बिया उधळल्या जातात अन् कारवीची नवीन रोपे या मेलेल्या झुडपाखाली पुन्हा सात वर्षांनी फुलण्यासाठी वाढू लागतात.
हेही वाचा: एकदांडीला वाचविण्यासाठी एकवटले निसर्गप्रेमी
कारवीचा आणखी एक भाऊबंद सह्याद्रीतल्या उंच शिखरांवर मिळतो. याचं नाव टोपली कारवी. टोपली कारवीची रोपं कारवीसारखी घाईगर्दी करून वाढत नाहीत तर ती वाढतात काही अंतर राखून. या झुडपांना जमिनीपासूनच अनेक फांद्या येतात त्यामुळं या झुडपांचा आकार दिसतो टोपलीसारखा. मात्र टोपली कारवी फुलली की त्यांचा बहर अगदी पाहण्याजोगा असतो.
कारवी ला बहर आला अशी बातमी पेपरमध्ये आली तर त्या वर्षी कारवीचा पुष्पोत्सव पाहायची संधी अजिबात घालवू नका.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.