ऑपरेशन भेडिया आता महत्त्वाच्या टप्प्यावर Operation Bhediya Bahraich Wolves
या गावांच्या चोहोबाजूला जंगलाचा वेढा, वाघ, बिबट्यांसह अनेक प्राणी तिथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून या जंगलातील प्राण्यांबद्दल गावकऱ्यांमध्ये फार चर्चा नव्हती किंवा दखल घेण्याइतपत फार गंभीर काही घडल नव्हतं. मात्र, गेल्या दोन महिन्यात झालेल्या घटनाक्रमांमुळे गावकऱ्यांची झोप उडाली आहे. जंगलातल्या प्राण्यांची गावकऱ्यांना आता भीती वाटते. रात्र झाल्यावर गावात शिरून, घरातल्या लहानग्यांना उचलून नेणाऱ्या टोळीने गावात दहशत निर्माण केली आहे. गेल्या दोन महिन्यात या टोळीने तीस पेक्षा अधिक गावांतील नागरिकांवर हल्ले केले असून आत्तापर्यंत या हल्ल्यात अकरा जणांचा मृत्यू झाला आहे. या टोळीला पकडण्यासाठी ऑपरेशन भेडिया आखण्यात आले आहे.. Operation Bhediya Bahraich Wolves
हे कोणतेही काल्पनिक कथानक नसून उत्तर प्रदेशमधील बहराईच या जिल्ह्यामध्ये हे नाट्य सध्या सुरू आहे. बहारईच हा जिल्ह्या वनसंपदेने समृद्ध आहे. या जंगलाला लागून अनेक गावं असून अनेक वर्षांपासून त्यांचे वन्यप्राण्यांबरोबर सहचर्य आहे. मात्र, सध्या या गावकऱ्यांना लांडग्यांची एक मोठी टोळी त्रास देते आहे. लांडग्यांच्या या टोळीने घाघरा नदीलगतच्या गावांमध्ये आत्तापर्यंत रात्री घरात शिरून माणसांवर हल्ले केले आहेत. यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे.
2nd International Conference on Green Hydrogen
दोन महिन्यांपासून वन विभागातर्फे या लांडग्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, घटना वाढतच असल्याने उत्तर प्रदेश सरकार, वन विभाग आणि तज्ज्ञांनी एकत्र येऊन ऑपरेशन भेडिया ही रणनिती आखली आहे. घटनांचा गांभीर्य ओळखून हल्ले करणाऱ्यां या लांडग्यांना जिवंत पकडा किंवा शिकार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी तीनशेहून अधिक वन अधिकारी, अभ्यासक, वन्यप्राण्यांसाठी कार्यरत संस्था, गावतील स्वयंसेवकांची पथके आणि २५ ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. सोशल मीडिया, न्यूजपेपर, चॅनेलच्या माध्यमातून गावांना सतर्कतेचा इशारा, स्वसंरक्षणाबाबतचे मार्गदर्शनही करण्यात येते आहे.
सर्वाधिक हल्ले झालेल्या गावांलगतच्या क्षेत्रात सहा लांडग्यांचा एक कळप राहत असल्याच वनाधिकारी सांगतात. आत्तापर्यंत पाच लांडग्यांना सापळा रचून पकडण्यात आले आहे. कळपातील लांडगे गायब झाल्याने उरलेले लांडगे सैरभैर झाले आणि त्यांनी माणसांवर हल्ले करायला सुरुवात केली, असे काही अभ्यासकांचे मत आहे, तर काहींनी पकडलेले लांडगे हल्ले करणारे होते, हे कसे ओळखणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ वाइल्डलाइफ या संस्थेचे अधिकारी आणि वन्यजीव तज्ज्ञ यात मोठी भूमिका बजावत आहेत. लांडग्यांच्या वर्तनातील नमुने (behavioral pattern) ओळखणे आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेच्या उपाययोजनांविषयी जागृती निर्माण करण्यासाठीही काम सुरू आहे. वन विभागाने पाच लांडगे पकडले असले तरी आमच्या गावात अजून डझनभर लांडगे मुक्तपणे फिरत असल्याचे गावकरी सांगत आहेत.
Leather Footwear Daily Wastage 45000 Kgs
हल्ले होत असलेल्या गावांच्या शेजारी ऊसासह इतर दाट वाढणाऱ्या पिकांची शेती आहे. त्यामुळे लांडग्यांच्या टोळ्या या शेतात राहतात. त्यांना पकडणेही कठीण आहे. संध्याकाळनंतर त्या सक्रीय होतात. गाव तसे दुर्गम भागातलं असल्याने तिथली घरी काही मोठी नाहीत. काही घरांना दरवाजे नाहीत, खिडक्यांना सुरक्षेसाठी गजही नाहीत. त्यामुळे रात्री दबा धरून बसलेले लांडगे शांतता झाली की घरात शिरतात आणि मुलांना उचलतात. अंगणात खेळणाऱ्या मुलांवरही काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. आपरेशन भेडिया महत्त्वाच्या टप्प्यावर असून ही टीम पुढची पावले कशी टाकते, त्यावर हा घटनाक्रम किती काळ चालणार हे अवलंबून आहे.
एकीकडे उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमधून लांडग्यांची संख्या वेगाने घटते आहे. या लांडग्यांना वाचविण्यासाठी वन विभागाकडून संवर्धन मोहीमा राबविण्यात येत आहेत. त्याच वेळी बहाराईच जिल्ह्यातील घटनांमुळे लांडगे वादात सापडले आहेत. मनुष्याच्या जीव वाचवायचा आहेच, त्याच वेळी लांडग्यासारखी प्रजाती नामशेष होणार नाही, याची काळजीही वन विभागाला घ्यायची आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.