Maharashtra Pakshimitra Sammelan - महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कार
महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित Maharashtra Pakshimitra Sammelan

महाराष्ट्र पक्षिमित्र पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित

पक्षी संवर्धन, जनजागृती या क्षेत्रात सातत्याने केलेल्या कामाबद्दल तसेच पक्षी विषयक संशोधन, संवर्धन, जनजागृती, पक्षी उपचार, पक्षी सेवा व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती आणि संस्थांचा गौरव व्हावा व त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र पक्षिमित्र तर्फे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार, पक्षी संशोधन पुरस्कार, पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार, पक्षी जनजागृती पुरस्कार आणि पक्षी साहित्य पुरस्कार अशा एकूण पाच पुरस्कारांचा समावेश आहे.

जीवन गौरव पुरस्कार आणि पक्षी साहित्य पुरस्कार हा जेष्ठ व्यक्तीस आणि इतर तीन पुरस्कार हे व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येतील. यासाठी पुरस्कार राशी अनुक्रमे रु. ५०००/-, रु. २५००/-, रु. २५००/- रु. २५००/- व रु. ५०००/- इतकी रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे पुरस्कारचे स्वरूप राहील.

जीवन गौरव पुरस्कार हा स्व. रमेश लाडखेडकर, स्मृती “महाराष्ट्र पक्षिमित्र जीवन गौरव पुरस्कार’-२०२४” या नावाने देण्यात येईल. दीर्घकाळ पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, पक्षीविषयक जनजागृती यासाठी कार्य केलेल्या व वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ व्यक्तीच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देण्यात येईल.

हेही वाचा: होम मिनिस्टरच्या पसंतीनंतरच सुगरणी पक्ष्याचे घरटे होते फायनल 

पक्षी संशोधन पुरस्कार – स्व. डॉ. जी. एन. वानखेडे स्मृती “महाराष्ट्र पक्षी संशोधन पुरस्कार – २०२४ असे या पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, संशोधन, आणि त्यातून संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल. पीएचडीचे संशोधन, प्रकल्पातील कार्य, संशोधन निबंध, प्रकाशित साहित्य, पेपर, रिपोर्ट, पक्षी नोंदणी अहवाल ई. चा विचार करण्यात येईल.

श्री. अनिल बहादुरे यांचे तर्फे प्रायोजित पक्षी संवर्धन व सुश्रुषा पुरस्कार-“महाराष्ट्र पक्षिमित्र, पक्षी संशोधन पुरस्कार -२०२४” या नावाने असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी संवर्धन, अधिवास संवर्धन, जखमी पक्षी उपचार व सुश्रुषा या क्षेत्रात कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

पक्षी जनजागृती पुरस्कार- रामभाऊ शिरोडे (वाणी) स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र, जनजागृती पुरस्कार -२०२४ या नावाने असेल. हा पुरस्कार पक्षिमित्र चळवळीत राहून पक्षी अभ्यास, आणि त्यातून जनजागृती आणि संवर्धन असे कार्य करणाऱ्या या क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती किंवा संस्था यांना देण्यात येईल.

हेही वाचा: ८ सप्टेंबरला शनी पृथ्वीच्या जवळ

श्रीमती सुशीला पाटकर स्मृती, महाराष्ट्र पक्षिमित्र, पक्षी साहित्य पुरस्कार -२०२४ असे पुरस्काराचे नाव असेल. हा पुरस्कार पक्षी विषयक साहित्यामधील योगदानासाठी देण्यात येईल. प्रकाशित साहित्यामुळे पक्षीविषयक ज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी झालेली मदत व पक्षी विषयक जनजागृती मध्ये साहित्याचे योगदान याचा यामध्ये प्रामुख्याने विचार केला जाईल.

दरवर्षी प्रत्येकी एक पुरस्कार देण्यात येईल आणि गरज पडल्यास विभागून देण्यात येईल (जीवन गौरव आणि साहित्य पुरस्कार सोडून). सर्व पुरस्कार त्या वर्षीच्या पुढील संमेलनात प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी निवड करतांना संस्था करिता महाराष्ट्र पक्षिमित्र संलग्न संस्थेचा तसेच व्यक्ती साठी महाराष्ट्र पक्षिमित्रचे सभासद, पक्षिमित्र संमेलनामधील सहभाग, पक्षिमित्र चळवळीतील सहभाग ई. चा प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

पुरस्कारासाठी प्रस्ताव दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत महाराष्ट्र पक्षिमित्रच्या पत्त्यावर, कार्यवाह, महाराष्ट्र पक्षिमित्र, व्दारा प्रा.डॉ. गजानन वाघ, ६३, अरण्यार्पण, समता कॉलनी, कठोरा रोड, व्हीएमव्ही पोस्ट, अमरावती ४४४६०४ किंवा Scan केलेला संपूर्ण प्रस्ताव PDF स्वरुपात संस्थेचा इमेल- pakshimitra@gmail.com वर पेपरलेस सुद्धा पाठविता येईल.

वरील पुरस्कारांसाठी स्वतः किंवा इतर व्यक्ती किंवा संस्था मार्फत प्रस्ताव सादर करता येतील. एखाद्या गटात योग्य प्रस्ताव प्राप्त न झाल्यास पुरस्कार जाहीर करण्यात येणार नाही. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्या दरम्यान पुरस्कारार्थी यांची नावे जाहीर करण्यात येतील. अर्जाचा नमुना व पुरस्कारांची सविस्तर माहिती संस्थेची वेबसाईट www.pakshimitra.org येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र पक्षिमित्रचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी दिली आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!