Achyranthes Aspera Aghada श्रावण आणि आघाड्याचं समीकरण काय?
श्रावण आणि आघाड्याचं समीकरण काय? Achyranthes Aspera

श्रावण आणि आघाड्याचं समीकरण काय? Achyranthes Aspera

श्रावण सुरू झाला की घरातली ज्येष्ठ मंडळी आघाड्याबद्दल चर्चा करतात, अलीकडे शहरी भागात आघाडा मिळणं कठीण झालय. गावाकडे आघाडा Achyranthes Aspera मुबलक असल्याची आठवणीही जागवतात. जाणून घेऊ या श्रावण आणि आघाड्याचं समीकरण…

अनेक कवितांमध्ये, गीतांमध्ये, साहित्यात मोठाच मान मिळवून असणारा श्रावण. श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजाच म्हटले जाते. आपले सारे सणवार, व्रत वैकल्ये श्रावणातच सुरु होतात. आषाढापाठोपाठ हलक्या सरी आणि उन्हाचा लपंडाव असणारा श्रावण अवतरतो. आषाढातले रौद्र रुप सोडून पावसाळा श्रावणात एकदम शहाणा, समंजस होतो.

आषाढात पावसाच्या धारांची सोबत करण्यासाठी उगवलेल्या अनेक नव्या वनस्पती श्रावणात फुलायला सुरवात करतात. त्यामुळे श्रावण केवळ हिरव्या हिरव्या गार गालिच्यांचाच न राहता फुलांचाही असतो. शुभ्र पांढरी, निळी जांभळी, गुलाबी, पिवळी असंख्य फुले या हिरव्या गालिच्यावर डुलायला लागतात. अन या फुलांच्या भोवती मधमाशा, भुंगे गुणगुणत रहातात.

Dipcadi Concanense Devrukhense

याच श्रावणात निसर्ग आपल्या परमोच्च बहरात असतो. हेच ते फिरण्यासाठी बाहेर पडण्याचे दिवस, त्यामुळेच की काय आपल्या पूर्वजांनी निसर्गात फिरण्याच्या, निसर्ग रक्षणाच्या किती तरी परंपरा श्रावण महिन्याशी गुंफल्या आहेत. त्यातली एक आहे पत्री वाहून केलेली पूजा, पत्रपूजा. या पत्री म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींची पाने.

लोकांनी ती निसर्गात जाऊन गोळा करावीत हा एक त्यातला हेतू. या वनस्पती ओळखता याव्यात, त्या माहिती व्हाव्यात हे सारे म्हणजे एक अर्थी वनस्पती वर्गीकरणशास्त्राचे बाळकडूच. यातली सर्वात महत्वाची पत्री आहे आघाडा. आघाडा ही आहे पावसाळी वर्षायू वनस्पती. वर्षायू म्हणजे एका वर्षात जिचे जीवनचक्र पूर्ण होते ती. तुमच्या घराच्या आसपास मोकळ्या जागी, रस्त्याच्या कडेला आघाडा तुम्हाला सहजपणे दिसू शकेल. ही वनस्पती वाढते सुमारे दोन फूट. त्याच्या गोलसर, एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या पानांवरुन ती सहज ओळखता येते.

फोटो साभार – https://indiabiodiversity.org/

फांदयांच्या टोकाशी आघाड्याला फुले येतात. ती असतात हिरव्याच रंगाची. पुढे फुलांची फळे होतात. फळांना लहान लहान काटे असतात. या काट्यांमार्फत, प्राण्यांच्या अंगाला चिकटून त्यांचा बीजप्रसार होतो. बिया पडून गेल्या कि आघाडा वाळून जातो. हे होईपर्यंत पावसाळाही संपत आलेला असतो. या बिया ठिकठिकाणी मातीत तश्याच राहातात आणि पुढच्य वर्षी पावसाळा आला की उगवतात. आघाडा गणपतीला वाहतात तसाच मंगळागौरीच्या पूजेतही त्याचा समावेश आहे. आयुर्वेदात काही औषधात त्याचा समावेश आहे. काही ठिकाणी दात घासण्यासाठी आघाड्याची काडी वापरात. आघाड्याला अपांग, अपामार्ग, कंटरिका, खारमंजिरी या नावांनीही ओळखले जाते.

हेही वाचा: रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू

अलीकडे शहरीभागात आघाडा पटकन मिळत नाही, त्यामुळे आजच्या नव्या पिढीला आघाडा माहिती नाही. मात्र, पालकांनी, बुजुर्गांनी मात्र मुलांपर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे. आपल्यापूर्वजांनी निसर्गाला दिलेला आदर, महत्त्व आणि प्रत्येक सणामध्ये निसर्गातील विविध घटकांची केलेली गुंफण किती खुबीने केली होती, याची जाणीव नव्या पिढीलाही झाली पाहिजे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!