श्री. द. महाजन यांना जीवनगौरव, तर भाऊ काटदरे यांना पर्यावरण भूषण पुरस्कार
ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक श्री. द. महाजन यांना जीवनगौरव, तर भाऊ काटदरे यांना पर्यावरण भूषण पुरस्कार Prof S D Mahajan Bhau Katdare

ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक श्री. द. महाजन यांना जीवनगौरव, तर भाऊ काटदरे यांना पर्यावरण भूषण पुरस्कार जाहीर

पर्यावरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत राहून भरीव योगदान दिल्याबद्दल पर्यावरण क्षेत्रातील भिष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ , संशोधक आणि अभ्यासक श्री . द . महाजन Prof. SD Mahajan यांना एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तर यंदाच्या ‘पर्यावरण भूषण’ पुरस्कारासाठी चिपळूण येथील पर्यावरण संवर्धक भाऊ काटदरे Bhau Katdare यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणेचे अध्यक्ष आमोद घमंडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सेनापती बापट रोड येथील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृहात समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.

वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या सोनवणे दाम्पत्याला यंदाचा बाबा आमटे पुरस्कार

यावेळी बोलताना आमोद घमंडे म्हणाले की, पुरस्कार निवड समितीने एकमताने आणि एकमुखाने श्री. द. महाजन यांच्या नावाची निवड केली आहे. पर्यावरण क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडियातर्फे पर्यावरण क्षेत्रात कार्यरत संस्था आणि व्यक्तींना
पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन ‘पर्यावरण भूषण’ आणि ‘पर्यावरण गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा या पुरस्कारांचे १६ वे वर्ष आहे.

एन्व्हायर्नमेंटल क्लब ऑफ इंडिया, पुणेचे सचिव गणेश शिरोडे म्हणाले की, यंदाच्या ‘पर्यावरण भूषण’ पुरस्काराचे मानकरी भाऊ काटदरे हे सह्याद्री निसर्ग मित्रचे संचालक असून गेल्या ३२ वर्षांपासून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहेत. तर समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत राहून पर्यावरण क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना ‘पर्यावरण गौरव’ पुरस्काराने गौरवण्यात येते.

यंदा पर्यावरण गौरव पुरस्कार वैयक्तिक वर्गवारीतून नाशिक येथील ‘जंगल मॅन’ म्हणून ओळख प्राप्त केलेले शेखर गायकवाड, पुण्यातील भुगावमधील तलावाचे पुनरुज्जीवन करून समाजासमोर अनोखे उदाहरण प्रस्थापित करणारे बाळासाहेब चौंधे, पत्रकारिते सारख्या समाज प्रबोधन क्षेत्रात काम करीत असतांना पर्यावरण क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या विविध प्रयोगांची दखल घेऊन त्या उपक्रमांना लेखांद्वारे योग्य प्रसिध्दी मिळवून देत समाजाचे पर्यावरणीय भान जागृत करणारे पत्रकार आणि सक्रिय पर्यावरणीय कार्यकर्ते श्रीकिशन काळे, राष्ट्रीय हरीत लवाद अर्थात एन.जी.टी.कडे पर्यावरण विषयक सर्वात जास्त दावे दाखल करुन पाठपुरावा करून पर्यावरणीय प्रश्नांकडे लक्ष वेधून ते प्रश्न सोडविण्यासाठी झटणारे अॅड. तानाजी गंभीरे आणि गेल्या २५ वर्षांपासून व्यवसायाने सनदी लेखापाल म्हणून कार्यरत असलेल्या आणि पर्यावरण पूरक घरे आणि सेंद्रिय बाग निर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्नेहल गोखले यांना गौरविण्यात येणार आहे. तर संस्थात्मक पातळीवर उर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुण्यातील प्रेरणा एनर्जी सहकारी संस्थेस ‘पर्यावरण गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment