Nag Panchami | जहाल विषारी तरीही घरोघरी नागाची पूजा
Nag Panchami | जहाल विषारी तरीही घरोघरी नागाची पूजा

नागपंचमी जवळ आली की दुकानांमध्ये नागाची चित्र असलेले देवघरात ठेवता येतील अशी पोस्टर, नागाच्या छोट्या मातीच्या मूर्ती दिसायला लागतात. पूर्वी नागाच्या पूजेसाठी घरोघरी गारुडी येत असत. दारात येऊन ते पेटारा उघडायचे, आपण त्याला दूध द्यायचो, पूजा करायचो, मग पेटारा पुढे दुसऱ्या घरी जात असे. कालांतराने सापांचा अभ्यास करणाऱ्यांनी नाग दूध पित नाही, त्याचे अन्न याबाबत जागृती करायला सुरुवात केली. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सापांचा खेळ दाखविण्यावर बंदी आली आणि खऱ्या नागांची जागा चित्र आणि भित्तीपत्रकांनी घेतली. पण नागाची पूजा करण्याची परंपरा आजही घराघरांमध्ये टिकून आहे. कारण नागपंचमी Nag Panchami मागे आपल्या पूर्वजांनी काही विचार करून ठेवले आहेत.

महाराष्ट्रात नागाला लाट, डोग्या, गव्हाल्या अशा विविध नावांनी ओळखलं जातं. सदाहरित वनं, निम सदाहरित वनं, शुष्क प्रदेश, गवताळ प्रदेश, पडकी घरं, वारुळं, भातशेती अशा प्रकारच्या ठिकाणी नाग आढळतात. त्याच्या फण्याच्या मागे मोडी लिपीतला दहाचा आकडा असतो. काही नागांच्या फण्यावर वेगळ्या स्वरूपाची नक्षी असते, तर काहींवर नसते. फण्याच्या आतल्या बाजूला दोन मोठे काळे ठिपकेही असतात. नागाचं मुख्य अन्न म्हणजे चामखिळी बेडूक, उंदीर, घुशी, पक्षी व त्यांची अंडी. हा साप इतर साप खाऊनदेखील आपली गुजराण करतो. उंदीर, घुशी शेताचं मोठं नुकसान करतात. त्यांना नाग खातात. त्यामुळे उंदीर-घुशींची संख्या मर्यादित राहण्यासाठी नागांचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखलं जातं. नागपंचमीला त्याचं पूजन करणं म्हणजे त्याच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग असतो.

हेही वाचा: सर्पमित्रांना मिळाला होता पद्मश्री पुरस्कार

नागाचाच एक भाऊबंद म्हणजे नागराज. त्याला इंग्रजीत किंग कोब्रा King Cobra असं म्हणतात. हा नागराज पश्चिम घाटात,  ईशान्य भारतातल्या घनदाट अरण्यात आढळतो. नागाच्या डोक्यावर नागमणी असतो असा एक गैरसमज आहे. या गैरसमजामुळे अनेक नागांची मोठ्या प्रमाणात हत्या होते. वास्तविक नागाच्या डोक्यावर असा कोणताही नागमणी नसतो. नागमणी म्हणून विकले जाणारे खडे बेंझाइनचे असतात. आपल्या संस्कृतीमध्ये आणि निसर्गामध्ये अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या नागांचं संरक्षण करणं, हे आपलं कर्तव्य आहे.

देशात तीनशे प्रकारचे साप

आपल्याला नाग, अजगर, मण्यार, घोणस.. अशी मोजकीच नाव माहिती असतात. पण आपल्या भारतात सुमारे २८० प्रकारच्या सापाच्या प्रजाती आढळतात. सापांचे तीन प्रकार असतात. काही विषारी, काही निमविषारी आणि उरलेले बिनविषारी.

जंगलातल्या प्राण्यांप्रमाणेच सापांचेही अधिवास (हॅबिटॅट) ठरलेले असतात. जंगलातले साप वेगळे, शेतात-माळरानांवर आढळणारे, पाण्यात राहणारे वेगळे, वाळवंटात राहणारे साप अजूनच वेगळे असतात. शत्रू समोर आला की साप घाबरून पळून जाण्याचा पर्याय निवडतात. धोक्याची सूचना देण्यासाठी ते फुत्कारतात , काही आपले शरीर चपटे करतात. तसे साप जरा आळशीच असतात. त्यांना रोज खायला लागतेच असे नाही. भक्ष मिळाले की ते आराम करतात. उपाशी असतात, तेव्हा ते शरिरावरील चरबीचा वापर करतात.

अतिउष्णता आणि अतिथंडी सापांना सहन होत नाही. ऊन वाढले तर थंड मातीच्या खाली लपतात तर थंडी वाढली की ते गरम रस्त्याकडे धाव घेतात. सापांच्या आकारानुसार त्यांचे खाद्य ठरतं. मुंग्याच्या अंड्यांपासून अगदी हरणाच्या पिल्लांपर्यंत सापांचे खाद्य विभागलेले आहे. भक्ष्याला विळखा घालून त्याला गुदमरुन मारतात. विषारी साप भक्ष्य मारण्यासाठी त्याच्या विषाचा वापर करतात. सर्वसाधारपणे साप दर दोन ते तीन महिन्यांनी कात टाकतात. कात म्हणजे त्वचेच्या मृतपेशींचा थर. कात टाकण्यापूर्वी काही वेळ साप अन्न घेत नाही.

सापांची माहिती देणारे स्नेकहब अप

सापांबद्दल पडणाऱ्या या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी स्नेकहब या मोबाइल ॲपमधून तयार करण्यात आले आहे. सर्प अभ्यासक डॉ. दिलीपकुमार आणि विवेक शर्मा यांनी केरळ आणि महाराष्ट्रातील सर्पतज्ज्ञांना एकत्र आणून स्नेकक हब या मोबाइल अपची निर्मिती केली आहे.

केरळमधील लोकांना मल्याळी, इतर भाषिकांना इंग्रजी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी यामध्ये मराठी भाषेत सापांची माहिती आणि मस्त फोटो यात आहेत. गुगल प्ले स्टोअरवरून हे अप डाऊनलोड करता येईल.

आपल्या देशात सापांबद्दल अनेक गैरसमज आहेत. सापांबद्दल असलेल्या भीतीमुळे त्यांना विनाकारण मारले जाते. तसेच सापांच्या दशामुळे लोकांचाही मृत्यू होतो. सापांची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळाली माणसाचा आणि सापांचा दोघांचाही जीव वाचवाता येऊ शकतो. त्यामुळेच स्नेकहबमध्ये देशातील सापांच्या १८३ प्रकारच्या सापांची माहिती यात आहे. 

सापांचे शरीरशास्त्र, त्यांच्याविषयी असलेले गैरसमज सर्पदंश आणि त्यावरील उपचार पद्धती यात सांगितली आहे. महाराष्ट्रात दिसणाऱया ७२ सापांचे फोटो आणि माहिती यात आहे.

प्रत्येक जिल्ह्यातील सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक आणि सर्पदंशावर उपचार करणार्‍या रुग्णालयांचे दूरध्वनी क्रमांकही यात आहेत.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment