सह्याद्रीच्या निवडक प्रदेशात, कातळसड्यांवर येणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण एकदांडी फुलाच्या संवर्धानासाठी नुकतेच कोकणातील अभ्यासक, संशोधक आणि निसर्गप्रेमी एकत्र आले होते. या फुलांचा अधिवास जपण्यासाठी, त्यांचे महत्त्व अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काय करता येईल, यावर दिवसभराच्या बैठकीत विचारमंथन करण्यात आले.
एकदांडी म्हणजेच कोकण दिपकाडी Dipcadi Concanense. ढोकाचे फुल किंवा गुलछडी या नावानेही तिला ओळखले जाते. सह्याद्रीतील दुर्मिळ वनस्पतांमध्ये समावेश असलेली ही वनस्पती देवरूख जवळील साडवली गावाच्या सड्यावर पावसाच्या महिन्यात फुलते. पांढऱ्या नाजूक फुलांची ही अनोखी प्रजाती कोकणात केवळ वीस पंचवीस ठिकाणी कातळ सड्यावर आढळून आली आहे.
कातळ सड्यावर या वनस्पतीची हिरवी पातीवजा पाने दिसू लागली की लवकरच एकदांडीचे संमेलन भरणार असल्याचे वेध पुष्पप्रेमींना लागतात. वर्षभर मातीत लपून राहिलेले या वनस्पतीचे कंद आकाशात ढग जमू लागले की सुप्तावस्थेत जागृत होतात. हिरवी गार कोवळी पाती अलगद जमिनीवर दिसू लागतात. सड्यावर होणारी गुरेचराई मधून वाचलेली पाती लांबसर होतात आणि श्रावण महिन्याची चाहूल लागल्यावर किंवा ऑगस्ट महिन्यात या एक दांडीवजा पात्याला पांढरी शुभ्र फुले येतात.
दिपकांडीला वनस्पती शास्त्राच्या भाषेत दीपकॅडी कोकनेन्स Dipcadi Concanense या नावाने ओळखले जाते. आंतराराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या इंटरनॅशलन युनिअन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर IUCN या महत्त्वाच्या संस्थेच्या दुर्मिळ प्रजातींचे वर्गीकरण करणाऱ्या रेड लिस्टमध्ये संकटग्रस्त प्रजातींच्या (एनडेंजर्ड) यादीत समावेश कऱण्यात आला आहे, अशी माहिती सह्याद्री संकल्प सोसायटीचे सीईओ प्रतीक मोरे यांनी दिली.
हेही वाचा: रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू
वनस्पती अभ्यासक डॉ अमित मिर्गळ यांनी या प्रजातीचा अभ्यास केला असून तिचा आढळ, धोके, संख्या आणि निसर्गसाखळीतील या वनस्पती महत्त्व या विषयावर सखोल सशोधन केले आहे. याशिवाय रॉड्रिग्ज आणि त्यांच्या सहसंशोधकांनी देवरूख मधील दिपकाडीच्या या प्रजातीचा देवरूख दीपकाडी Devrukhense ही नवीन प्रजातीही शोधली आहे. या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धनाची गरज ओळखून सह्याद्री संकल्प सोसायटी, आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आणि इंदिरा इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी या संस्था गेल्या काही वर्षांपासून एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत.
याच अंतर्गंत डॉ. अमित मिरगळ, डॉ प्रताप नाईकवाडे, सह्याद्री संकल्प सोसायटी चे अध्यक्ष डॉ शार्दुल केळकर आणि सीईओ प्रतिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी दिपकाडी संवर्धन विषयक कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी प्रत्यक्ष सड्यावर जाऊन या प्रजातीची परिसंस्था, वनस्पतीचे इतर प्रजातींबरोबरचे सहसबंध, या प्रजातींचे परागीभवन करणारे कीटक या विषयीचा अभ्यास यावेळी करण्यात आला. तसेच या वनस्पतीच्या संवर्धनासाठी आणि तिचे इतर ठिकाणी संगोपन, प्रसार आणि लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.
हेही वाचा: प्रत्येक पाऊस मुसळधार नसतो
दीपकाडीच्या या प्रजातीचे महत्त्व, हार गजरे आणि सजावटी मध्ये केला जाणारा वापर करताना तो शाश्वत पद्धतीने करण्याविषयीचे मार्गदर्शन डॉ अमित मिर्गल यांनी केले. डॉ प्रताप नाईकवाडे यांनी सडे परिसंस्थेचे पर्यावरणातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ शार्दुल केळकर आणि प्रतिक मोरे यांनी सड्यावरील जैव विविधतेविषयी माहिती दिली. मुंबई तरुण भारतचे पर्यावरणविषयक वार्तांकन करणारे अक्षय मांडवकर आणि हॅबिटॅट ट्रस्ट यांनी केलेला माहितीपट या वेळी विद्यार्थ्यांना दाखवला.
या वनस्पतीचे औषधी, सांस्कृतिक आणि सजावटी मध्ये केले जाणारे उपयोग यावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता असून असे प्रकल्प विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले जातील आणि यातून या वनस्पतीच्या अधिवासातील आणि नर्सरी मधील संवर्धनाचे विविध उपक्रम महाविद्यालय आणि सह्याद्री संकल्प सोसायटी च्या माध्यमातून राबवले जातील असे नियोजन करून या कार्यशाळेची सांगता करण्यात आली. या प्रसंगी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे, प्रा. डॉ. मेधा खाडे, प्रा. निकुल पटेल सर्व कर्मचारी वृंद, रेनट्री फाउंडेशनचे किशोर राक्षे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.