Ranbhaji Forest Vegetables रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू
रानभाज्यांचा हंगाम झाला सुरू Ranbhaji Forest Vegetables

पावासाळा सुरू झाल्यावर गावकऱ्यांच्या रोजच्या जेवणात काही नवीन भाज्या दाखल होतात. पावसाळी आजारांचा प्रतिकार करण्याचे गुणधर्म या भाज्यांमध्ये असल्याने घरातली मोठी माणसं मुलांना कधी आग्रह तर कधी सक्ती करून या भाज्या खायला सांगतात. अलीकडे या भाज्यांचे महत्व समजल्याने गावातल्या आठवड्याच्या बाजारांबरोबरच शहरांमध्येही रानभाज्या महोत्सव सुरू झाले आहेत. Ranbhaji Forest Vegetables

अलीकडे वर्षभर भाजी मंडई, बाजारपेठांमध्ये सगळ्या भाज्या, फळे मिळत असल्याने शहरी मंडळींना हंगामानुसार पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची माहिती नसते. पण गावात मात्र अनेक कुटुंबांमध्ये हंगामानुसार भाज्यांचे समीकरण बघायला मिळते. पावसाळा सुरू झाली की त्यांच्या ताटात नवनवीन भाज्या दिसायला लागतात. यातील बहुतांश भाज्यांची शेती केली जात नाही. पावसाळा सुरू झाला की नैसर्गिकरित्या त्या गवताबरोबर रानावनात, शेताच्या बांधावर उगवतात आणि पाऊस थांबला की त्यांचाही हंगाम संपतो. विशेष म्हणजे या भाज्यांना औषधी गुणधर्म असतात. त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी या भाज्यांना आहारामध्ये समावेश केला असावा.

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात येणाऱ्या रानभाज्यांमध्ये वैविध्य बघायला मिळते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आढलणाऱया , विदर्भ मराठवाड्यात आढळणाऱया काही भाज्या वेगेवगळ्याही असतात. विदर्भातील जंगलांमध्ये, रानावनात आढणारी कुड्याची भाजी, तरोटा भाजी म्हणजे आदिवासींचे पारंपिक अन्न. खर तर, या भाज्यांना फार काही चव नसते, पण त्या शिजविण्याच्या निरनिराळ्या पद्धतींमुळे त्या चविष्ट होतात. सर्दी, खोकला, ताप, पोट दुखीच्या तक्रारींवरही या भाज्या गुणकारी आहेत. या भाज्यांच्या सेवनातून शरीराला फायबर, प्रथिने, लोह, जीवनसत्त्व मिळतात. रानकेळी, टाकळ्या, भारंगी, शेकट्या, कुवाळू, शेवळे,भोपा, चायवड, टेकाडे, काटवल या भाज्या विदर्भात लोकप्रिय ठरतात. कुर्डूचं रान जेव्हा कोवळं असतं, तेव्हा त्याच्या पाल्याची भाजी करतात. ही रानभाजी भाकरीसोबत छान लागते.

सह्याद्रीच्या डोंगररागांगांमध्ये या भाज्यांबरोबर इतरही काही भाज्या खाल्या जातात. यातील एक महत्त्वाची वनस्पती म्हणजे भारंगी. या भारंगीची फुलं गुच्छ स्वरूपात येतात. ही रानफुलं म्हणून तर सुंदर दिसतातच; पण भारंगीच्या फुलांची भाजीही केली जाते. ती भाजी सहज कोणाला आवडण्यासारखी नाही. कारण तिची चव थोडी कडवट असते; पण या भाजीचे गुणधर्म मात्र खूप पौष्टिक आहेत.

हेही वाचा: प्रत्येक पाऊस मुसळधार नसतो 

रानात आढळणाऱ्या कुडा नावाच्या वनस्पतीच्या फुलांचे सांडगे छान होतात. ती फुलं न काढता झाडांवर ठेवली, तर शेंगा येतात. त्या शेंगांची भाजी चांगली होती. ही भाजी कृमिनाशक असते.
टाकळा ही तशी सर्वत्र आढळणारी रानभाजी आहे; मात्र पावसाळ्याच्या पहिल्या एखाद्या महिन्यातच टाकळ्याची भाजी चांगली मिळते. त्यानंतरच्या काळात ती जून होत असल्याने चव अधिक कडू होत जाते.

कर्टुली ही काकडीवर्गीय रानभाजी आहे. तोंडलीला बाहेरून काटे आले तर कसं दिसेल, तशी ही कर्टुली दिसतात. कर्टुलीचं भरीत छान होतं. भाजीही केली जाते. नावाप्रमाणेच ही भाजीही कडूच असते.

अळूची भाजी सगळ्यांना माहिती असते; पण पावसाळ्याच्या काळात काही झाडांवरही अळू येतं. त्याला रुख अळू असं म्हणतात. (रुख म्हणजे झाड) या रुख अळूच्या पानांच्या अळूवड्या चविष्ट होतात.

हेही वाचा: व्याघ्र दिनाच्या दिवशी शिकऱ्यांची चर्चा

रानभाज्यांचे महोत्सव
गावांमधील रानभाज्यांविषयी असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे जतन व्हावे, गावातील, शहरातील पुढच्या पिढीला या भाज्यांची ओळख आणि महत्व कळावे, या हेतून अलीकडे विविध संस्थांनी रानभाज्यांचे महोत्सव आयोजित करायला सुरुवात केली आहे. भिमाशंकर जवळच्या गावांमध्ये, जुन्नर, आंबेगाव, ठाण्यानजीकची लहान गावे, मुरबाड, वेल्हे, भोर, सातारा, कोल्हापूरमधील लहान गावांमध्ये रानभाजी महोत्सव वाढत आहेत. शहरातील निसर्गप्रेमी संस्थांनीही यात पुढाकार घेतला असून शाळा, सोसायट्यांच्या पातळ्यांवर असे महोत्सव सुरू झाले आहेत. पंचतारांकित हॉटेल मधील प्रसिद्ध शेफने भविष्यात रानभाज्यांच्या भन्नाट रेसिपी शोधून काढल्या तर लवकरच औषधी गुणधर्म असलेल्या या रानावनातील भाज्याही प्रसिद्धीच्या झोतात येतील, अशी निसर्गप्रेमींची मागणी आहे.

तुम्हाला कोणत्या रानभाज्या माहिती आहेत, तुम्ही कोणत्या भाज्या खाता, त्यांची रेसिपी आम्हाला शेअर करा आम्ही ती इतरांपर्यंत पोहोचवू.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment