आमच्या भागात काल मुसळधार पाऊस पडला, रात्री झोपेतून जाग आली तर खिडकीतून जोरदार पाऊस Heavy Rainfall पडताना दिसला.. ऑफिसमधून घरी निघताना बोचऱ्या पावसातून यावे लागले…
आपण पाहिलेला पाऊस कित्ती मोठा होता याची विशेषणे वापरायला लोकांना खूप आवडते. पावसाच्या तीव्रतेवरून गप्पाही रंगतात. पण खरच प्रत्येक पाऊस मुसळधार Heavy Rainfall किंवा जोरदार असतो का..
भारतीय हवामानशास्त्र विभागाने पावसाच्या तीव्रतेच्या व्याख्या निश्चित केल्या आहेत. पाऊस किती मिलीमीटर पडतो, त्यानुसार हलक्या सरी, मध्यम, तीव्र की जोरदार हे जाहीर केले जाते. वेधशाळेने संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या शहरात, जिल्ह्यात, घाट माथ्यांवर पाऊस मोजण्याची स्टेशन बसविलेली आहेत. या स्टेशनवरून दर तासाला पावसाच्या नोंदी घेतल्या जातात. त्यांच्या वेबसाइटवर सकाळी साडे आठ ते सायंकाळी साडे पाच हे पहिले बुलेटिन प्रसिद्ध केले जाते. मग साडे आठपर्यंतचा पाऊस जाहीर केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी चोवीस तासात पडलेला एकूण पाऊस ते जाहीर करतात. हा पाऊस मुख्यत: सेंटीमीटर किंवा मिलीमीटरमध्ये सांगतात.
हवामानाचा अंदाज व्यक्त करताना मात्र किती मिलीमीटर पाऊस पडणार या पेक्षा तो किती तीव्रतेचा असेल, याचे अंदाज सांगितले जातात. उदारणार्थ पुढील दोन दिवसात मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडेल. घाट माथ्यमावर जोरदार पावसाची शक्यता. काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता, असे अंदाज व्यक्त करतात.
सर्वसामान्यांना वाटणारा पाऊस वेधशाळेच्या व्याख्यात कसा बघतो हे बघा
खूप हलका म्हणजे २ मिलीमीपेक्षाही कमी
पावसाच्या हलक्या सरी – १० मिलीमीटर (तासात)
मध्यम सरी – १० ते २० मिलीमीटर
तीव्र सरी २० – ३० मिलीमीटर
जास्त तीव्र सरी ३० ते ५० मिलीमीटर
अतितीव्र सरी – ५० ते १०० मिमी
ढगफुटी – १०० मिमी सलग एका तासात
हलका पाऊस २.५ ते १५.५ मिमी
मध्यम पाऊस १५.६ ते ६४.४ मिमी
मुसळधार पाऊस ६४.-११५.५
जोरदार ११५.६-२०४.४
अतिवृष्टी २०४ मिमी पेक्षा जास्त
वेधशाळेच्या नोंदवहीमध्ये १ जूनला पावसाचा हंगाम सुरू होतो आणि ३१ सप्टेंबरला हंगाम संपतो. यानंतर म्हणजे ऑक्टोबरनंतर पडणारा पाऊस पोस्ट मॉन्सून मानला जातो.
हेही वाचा: व्याघ्र दिनाच्या दिवशी शिकऱ्यांची चर्चा
प्रत्येक महिन्यात प्रत्येक शहरात, जिल्ह्यात सरासरी किती पाऊस पडतो, याचे आकडे निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे पावसाचे हंगामी अंदाज वर्तवताना यंदा सरासरीपेक्षा जास्त किंवा कमी पाऊस पडणार याचे भाकीत सांगितले जाते. गेल्या काही वर्षात पावसाचे दिवस कमी झाले आहेत, मात्र कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्याचे नवीन निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाने नोंदवले आहे.
नेहमी वापरले जाणारे काही शब्द
पावसाची रिपरिप/पिरपिर – Incessant Light Rain
संततधार/पावसाची झड – Incessant Heavy Rain
गारांचा पाऊस/गारपीट – Hailstorm
अतिवृष्टी – Excessive Rainfall
थांबून थांबून पडणारा पाऊस – Intermittent Rain
गडगडाटी पाऊस/मेघगर्जनेसहित पाऊस – Thunder Showers
वादळी पाऊस/पावसाचे वादळ – Stormy Rain/Rain Storm
ढगफुटी – Cloudburst
ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही या पुढे आपण पाहिलेला पाऊस कोणत्या व्याख्येत बसतो याचा विचार नक्की करणार, याची खात्री आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com