देशभरात व्याघ्र दिन World Tiger Day साजरा होत असताना, महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन दिवसांपासून वाघांची शिकार करून कातडी विकणारे मोठे रॅकट पकडले गेल्याची चर्चा सुरू आहे. पुण्यातील सीमा शुल्क विभागाने व्याघ्र दिनाच्या पूर्व संध्येला (२८ जुलैला) वाघांच्या तस्करीशी संबंधित सहा आऱोपींना ताब्यात घेतले, त्यात दोन महिलांचाही समावेश होतात. धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडून वाघाची कातडीही जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात पकडलेल्या मुख्य आरोपीवर या पूर्वीही वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाघांच्या तस्करांना पकडण्यासाठी नागपूर, जळगाव आणि पुण्यातील सीमा शुल्क विभागाने गेल्या आठवडाभरात एक स्टिंग ऑपरेशन केले. तस्करी संदर्भात नागपूर सीमा शुल्क विभागाला प्राथमिक माहिती मिळाली होती, त्या आधारे टोळी जळगाव परिसरात आल्याची माहिती मिळतात, त्यांनी पुणे सीमा शुल्क विभागाशी संपर्क साधला आणि पुण्याच्या अधिकाऱ्यांनी पुढील जबाबदारी सांभाळली. तपास पथक २६ तारखेला पुण्यातून निघाले आणि सापळा रचून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.
मिळालेली कातडी साधारणपणे पाच फूट लांब असून तिचे वय चार ते पाच वर्षे असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. या कातडीची किंमत आतंरराष्ट्रीय बाजारात लाखांच्या घरात असल्याचाही त्यांचा दावा आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या सीमारेषेवरील जंगलात या वाघिणीची शिकार करण्यात आली. यासाठी आरोपींना वाघाला मारण्यासाठी एका गाईला विष देऊन मारले आणि या गाईची वाघाने शिकार केल्याने वाघाचाही मृत्यू झाला. पकडलेले आरोपी मूळचे कुठले आहेत, त्यांचे रॅकेट कोणकोणत्या जंगलात पसरले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांचे लागेबांधे याबाबत पुणे सीमा शुल्कचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे
एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी भारताकडून राबविल्या जाणाऱया उपाययोजना, टायगर टास्क फोर्सच्या कामाबद्दल जगभरातून देशाचे कौतूक होत असताना, वन्यप्राण्यांची चोरटी शिकार प्रशासनासाठी त्रासदायक ठरली आहे. जगभरात वाघांसह इतर वन्यप्राण्यांची कातडी, नखे, त्यांच्या विविध अवयवांना भरपूर मागणी असून पैसेही मिळतात. भारतातील वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय तस्करांची सध्या आपल्या व्याघ्र प्रकल्पांकडे नजर असून दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तस्करी रोखण्यासाठी वन विभागाने जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आणि शिकारीचे तोटे या बद्दल जनजागृती करायला सुरुवात केली आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.