वाघांची संख्या वाढविण्यास भारताला यशस्वी World Tiger Day
वाघांची संख्या वाढविण्यास भारत यशस्वी World Tiger Day

जगभरातील संकटग्रस्त, नष्ट होण्याचा धोका असलेल्या वाघांना वाचविण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्र दिन World Tiger Day म्हणून साजरा केला जातो. तीन महिन्यांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वाघांची संख्या वाढल्याचे जाहीर करून वन्यप्राणीप्रेमींना आनंदाची बातमीच दिली आहे. त्यामुळे यंदाचा व्याघ्र दिन विशेष आहे. 

वाघांना आज विशेष संरक्षण देण्याची वेळ आली याचे कारण देशभरात शंभर-दीडशे वर्षात वाघांची मोठ्या प्रमाणात शिकार झाली. वाघांची कातडी आणि वेगवेगळ्या अवयवांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने अनेकांनी वाघांची शिकार केली. जंगलांमधील वृक्षतोड वाढली, माणसाचा वावर वाढल्याने वाघांची वसतिस्थानेही धोक्यात आली. त्यांचे अन्न असलेल्या प्राण्यांची संख्याही कमी झाली. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे भारताबरोबरच काही देशांमधील वाघ संकटात सापडले. त्यामुळेच भारत सरकराने पुढाकार घेऊन पन्नास वर्षांपूर्वी वाघांना वाचविण्याची मोहीम आखली. वाघांचे वास्तव्य असलेल्या जंगलांना व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. व्याघ्र संवर्धनाला प्रोजेक्ट टायगर असे नाव देण्यात आले. या जंगलावर वन विभागाने अधिक लक्ष दिले. तेथील सुरक्षा, वाघांच्या संरक्षणासाठी विशेष काळजी घेण्यात आली. जंगलांमधील वाघांची संख्या कमी होते आहे की घटली हे बघण्यासाठी सरकारने दर चार वर्षांनी व्याघ्र गणना करण्याचा निर्णय घेतला. अधिक काळजी घेतल्यामुळे हळूहळू चांगले बदल दिसायला लागले. कौतुकाची बाब म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या गणनेतही वाघांचे आकडे वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय वने पर्यावरण आणि हवामानबदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कर्नाटकमध्ये एका कार्यक्रमात तीन महिन्यांपूर्वी वाघांची संख्या दोनशे वाढल्याचे जाहीर केले आहे.  आकडेवारी नुसाराभारतात सर्वाधिक वाघ मध्यप्रदेशमध्ये वास्तव्यास असून त्या खालोखाल कर्नाटक, महाराष्ट्राचा समावेश होतो. मध्यप्रदेश सध्या ५२६, कर्नाटकमध्ये ५२४ आणि महाराष्ट्रात ४०० हून अधिक वाघांची नोंद झाली आहे. याशिवाय उत्तराखंड, राजस्थान, तमिळनाडू, केरळ, आसाम, आंध्रप्रदेश, तेलगंण, बिहार,ओडिशा, छत्तीसगड आणि गोव्यातही वाघांच्या नोंदी आहेत.

हेही वाचा: प्रोजेक्ट टायगर च्या पन्नाशी निमित्त ५० रुपयांचे विशेष नाणे

प्रोजेक्ट टायगरसाठी निवडलेल्या पहिल्या काही व्याघ्र प्रकल्पांमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मेळघाट या जंगलाचा समावेश होता. पुढे हळूहळू व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढत गेली. आज भारतात ५३ व्याघ्र प्रकल्प आहेत. महाराष्ट्रात ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर, मेळघाट आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. आपल्याकडे सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात. 

india tiger count 3167
Image by Devendra Gogate

भारतात वाघांना वाचविण्यासाठी कार्यरत असलेली देशव्यापी संस्था म्हणजे नॅशनल टायगर कॉन्झर्व्ह्रेशन अथॉरिटी. तर जगभरातील वाघांना वाचविण्यासाठी ग्लोबल टायगर फोरम ही संस्था काम करते. जगभरात सध्या भारत वगळता व्हिएतनाम, चीन, भूतान, बांगलादेश, थायलंड, नेपाळ, मलेशिया, इंडोनेशिया, रशियामध्ये वाघ जंगलांमध्ये वास्तव्यास आहेत….

भारतातील वाघांची वाढत गेली संख्या

  • सन २००६ – १४११
  • सन २०१० – १७०६
  • सन २०१४ – २२२६
  • सन २०१८ – २९६७
  • सन २०२३ – ३१६४

वाघांची गणना कशी करतात?

आपल्या शहरात, राज्यात किंवा देशात किती माणसं राहतात, हे जाणून घेण्यासाठी सरकार काही ठरावीक वर्षांनी जणगणना करते. त्याप्रमाणेच वन्यप्राण्यांचीही मोजणी केली जाते. त्याला प्रगणना म्हणतात. वाघांच्या मोजणीचीही पद्धत वेगळी आहे. पूर्वी वन अधिकारी कर्मचारी, संशोधक जंगलात फिरून वाघांच्या पंजाचे ठसे मिळवायचे, प्रत्येक ठशाचा अभ्यास केला जात असे. उन्हाळ्यात रात्रभर जंगलातील पाणवठ्यांवर बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या वाघांची मोजणी केली जात होती. मात्र, त्यामध्ये खूप त्रुटी राहायच्या. हल्ली वाघांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून केली जाते. जंगलात विविध ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवतात. पाणवठ्याजवळ, वाघांच्या पायवाटेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कॅमेरे बसवले जातात. त्यामधून कोणताही प्राणी क्रॉस झाला की कॅमेरा हळूच त्याचा फोटो टिपतो. प्रत्येक जंगलात टिपलेल्या हजारो फोटोंचा वन्यप्राणी अभ्यासक अभ्यास करतात. सर्वसामान्यांना सगळे वाघ दिसायला सारखे वाटत असले तरी प्रत्येकाच्या अंगावरचे पट्टे वेगवेगळे असतात. अजूनही काही फऱक असतात ते अभ्यासकांना बरोबर समजतात. कित्येकदा एकाच वाघाचे अनेक फोटोही निघालेले असतात. त्यामुळे कॅमेऱ्याने टिपलेल्या प्रत्येक फोटो बारकाईने बघून ते त्यांचे वर्गीकरण करतात. त्यानंतरच आकडे जाहीर केले जातात.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!