हापूस, केशर, तोतापुरी, पायरी अशा मोजक्याच आंब्यांची नावे शहरी मंडळीच्या कानावर पडत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का भारतात आंब्याच्या पंधराशेहून अधिक प्रकारच्या जाती आढळतात. यातील काही आंबे केवळ आकाराने मोठे, तर काही आकाराने लहान मात्र साखरेपेक्षा गोड, काहीचा गर खोबऱ्या प्रमाणे तर काही चवीला खूप आंबट… यातील अनेक आंब्यांच्या जाती या त्या त्या प्रदेशापुरत्या, राज्यापुरत्या मर्यादित असल्याने आपल्यापर्यंत त्या पोहोचत नाहीत. एवढंच कशाला आपल्या कोकणातही दीडशे प्रकारेच आंबे मिळतात. आमट्या, नाकाड्या, ढोब्या अशा वेगवेगळ्या नावाने या आंब्यांना ओळखले जाते. यातील प्रत्येक आंब्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे असून त्यांचे उपयोगही निरनिराळे…
आता तुम्ही म्हणाल, आंब्याचा हंगाम संपल्यावर तुम्ही आंब्याची बातमी का करत आहात .. यावर आमचे उत्तर आहे.. अहो, आता भोपळ्याचा म्हणजेच भोपळी नावाच्या प्रवर्गातील आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे. कोकणातील स्थानिक वाणांपैकी एक असलेला भोपळी आंबा हा कोकणवासीयांचा लाडका आंबा. इतर आंब्यांचा हंगाम संपल्यानंतर या महाशयांना झाडावरून खाली उतरवले जाते.
हापूसच्या मागे लागलेले कोकणातील अनेक शेतकरी स्थानिक आंब्याच्या जाती बाजारपेठेत आणत नाहीत. पण तिथे काहींनी फळबागांमध्ये अनवट नावे असलेल्या आंब्यांच्या जाती जपल्या आहेत. त्यांपैकी उत्साही बागायतदार श्रीकांत बापट यांनी निसर्गरंगच्या टीमला भोपळीची ओळख करून दिली.
हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE
चिपळूण तालुक्यात बापट यांनी त्यांच्या बागेत २२ प्रकराच्या आंब्याच्या झाडांचे संवर्धन केले आहे. या प्रत्येकाचा हंगाम उन्हाळ्यातच पण पुढे-मागे असतो. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी बागेतून भोपळ्या आंब्याची पहिली पाच फळे झाडावरून उतरवली.
बापट म्हणाले, हापूस आंब्याचे वजन साधारण २५० ग्रॅम असते. पण भोपळी आंबा मोठा, वजनाला सुमारे दीड किलोपर्यंत असतो. बागेतून नुकताच काढलेल्या आंब्याचे वजन एक किलो चारशे पन्नास ग्रॅम आहे. हा स्थानिक आंबा आहे. आकाराने तो गोल असतो. स्थानिक असल्याने येथील वातावरणाशी तो जळवून घेतो. पावसाळ्याचा सहसा त्यावर काही परिणाम होत नाही.
इतर आंबे संपत येतात, तेव्हा हे आंबे येतात. भोपळी आंबा साधारण जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत टिकतो. हे आंबे कच्चे खायला अप्रतिम लागतात. अनेक जण भोपळीच्या फोडी मीठ-मसाला लावून चवीने खातात. आमच्याकडे येणाऱ्या पर्यटकांना या फोडी खायला दिल्या तर ते घरी परतताना आवर्जून आंब्याची मागणी करतात. हा आंबा जसजसा पिकत जातो, तशी त्याची चव उतरायला लागते. याला इतर आंब्याच्या तुलनेत आंबटपणा नाही. प्रामुख्याने लोणच्यासाठी भोपळी आंबा वापरला जातो. त्याचे लोणचे, मुरांबा अप्रतिम लागतो. प्रामुख्याने वयस्क नागरिकांना खाण्यासाठी या किसलेल्या आंब्याचा मुरांबा खाणे अधिक सोयीस्कर जाते. मी आंब्यांची नैसर्गिक शेती करतो, त्यावर कोणतीही रासायनिक, कृत्रिम पिकांची फवारणी करत नाही. त्यामुळे माझ्याकडील आंबे अगदी नैसर्गिक असतात, असे श्रीकांत बापट यांनी अभिमानाने सांगतले.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.