ऑलिव्ह रिडले Olive Ridley Turtle या कासवांमधील मादी केवळ अंडी घालण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर येतात. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले कासवांची तुरळक घरटी सापडतात. ही कासव रेतीमध्ये खड्डा करून अंडी ठेवतात. त्यांना मातीने झाकून सुरक्षित केल्यावर पुन्हा समुद्राकडे निघून जातात. अंड्यांना पालकांकडून संगोपन किंवा जगण्याचे धडेही मिळत नाहीत. अंड्यातून पिल्लं बाहेर आली की स्वतःहूनच समुद्राच्या दिशेने चालायला लागतात.
समुद्रात गेल्यावर या कासवांचे जीवनचक्र कसे असतात, ती कुठे जातात, स्थलांतर करतात का.. अशा प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी वन विभाग, मॅनग्रूव्ह फाउंडेशन Mangrove Foundation आणि डब्ल्यूआयआय Wildlife Institute of India तर्फे एक संशोधन प्रकल्प राबविण्यात येतो आहे. या अंतर्गत गुहागरच्या किनारपट्टीवर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या दोन ऑलिव्ह रिडले मादी कासवांना पकडून अभ्यासकांच्या टीमने कासवांच्या पाठीवर सॅटलाइट ट्रान्समीटर बसवले आणि त्यांना पुन्हा समुद्रात सोडले. बागेश्री आणि गुहा अशी या मादी कासवांची नावे ठेवली आहेत. गेल्या चार महिन्यांपासून या दोघी समुद्रात कुठे फिरत आहेत, याच्या नोंदी सॅटलाइटमार्फत घेतल्या जात आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले कासवांचा हा पहिला सॅटेलाइट टॅगिंग प्रकल्प आहे.
बागेश्रीने पहिल्या काही दिवसातच रत्नागिरीहून प्रवास करत कन्याकुमारीपर्यंत मजल मारली होती. आतापर्यंत तीने समुद्रात सुमारे दीड हजार किलोमीटर प्रवास केला आहे. सध्या ती श्रीलंकेची राजधानी कोलंबोच्या किनारपट्टीजवळ दीडशे किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. तर गुहा गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्या जवळील समुद्रात घुटमळते आहे. गुहाने गेल्या दहा दिवसात अडीचशे किलोमीटर अंतर कापले असून लक्षद्वीपजवळील कडमट बेटाच्या दिशेने तिचा प्रवास सुरू आहे. पुढच्या वर्षीचा अंडी घालण्याचा हंगाम येईपर्यंत या दोघी किती दूर प्रवास करतात, पुन्हा त्या गुहागर किनारपट्टीवरच येणार का या बद्दल अभ्यासकांना कुतूहल आहे. सॅटलाइनट प्रोजेक्टमुळे पहिल्यादा या भागातील सागरी कासवांच्या भटकंतीची माहिती नोंदवली जाणार आहे.
हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.