फुलपाखरांचे उद्यान आमच्या बागेत Butterfly Garden
फुलपाखरांचे उद्यान आमच्या बागेत Butterfly Garden

नाजूक नक्षीकाम आणि रंगबिरंगी पंखांची फुलपाखरे सगळ्याच वयातील लोकांचे लक्ष वेधतात. लहान मुले चित्र काढायला शिकवल्यावर फुलाचे चित्र काढायला शिकतात, तेव्हा पटकन आपण त्यांना फुलाभोवती घुटमळणारे फुलपाखराचं चित्रही शिकवतो. तर असे हा जगातील सर्वात सुंदर कीटक कोणत्याही बगिचाची शान वाढवतो. त्यामुळेच जगभरात सध्या फुलपाखरू उद्यान Butterfly Garden साकारण्याची लाट आली आहे.

ही उद्याने बंदिस्त स्वरुपाची असतात. फुलपाखरांना आवडणारी, त्यांची खाद्य असलेली, त्यांना अंडी घालण्यासाठी आवश्यक असलेली झाडे या बंदिस्त जागांमध्ये लावली जातात. त्यांच्यासाठी गरजेचे तापमानही तिथे ठेवले जाते. अभ्यासक पकडलेल्या फुलपाखरांना या उद्यानात सोडून देतात. त्यांच्यावर नियमित देखरेख केली जाते. शास्त्रीय पद्धतीने उभारली जाणारी जगभरातील अनेक फुलपाखऱू उद्याने यशश्वी झाली आहेत. एवढेच नव्हे तर तिकिट दाढून लोक ही उद्याना बघायला जातात.

आपल्याला मात्र तसं करायचं नाही, आपण बागेत नवीन झाडे लावतो, तेव्हा त्यात काही झाडे फुलपाखरांना आवडतील अशी आणायची आहेत. गंमत म्हणजे तुम्ही राहत असलेल्या भागात फुलपाखरांचा थोडा वावर असेल तर नक्कीच ती आमंत्रण न देता तुमच्या बागेत विहार करायला लागतील. कारण वाढत्या शहरीकरणामुळे फुलपाखरांना आज त्यांची वसतिस्थाने, अन्न शोधण्यासाठी शोधाशोध करावी लागते आहे. परदेशी प्रकारातील शोभेची झाडे अनेक सोसायट्यांच्या आवारात लावलेली असतात, पण यातील बहुतांश झाडे फुलपाखरांनी अजून स्वीकारलेली नाहीत. त्यामुळे आपण हौसेने जेव्हा झाडे लावतो, तेव्हा त्यात काही फळझाडे, स्थानिक फुल झाडांचा आवर्जून समावेश केला पाहिजे. एकदा फुलपाखरे आली की त्यांना पकडण्यासाठी पक्षीही येतात.

हेही वाचा: बायोस्फिअर्स संस्थेतर्फे माऊली हरित अभियानाचा उपक्रम

कधी तरी तुम्ही गच्चीतील बागेत किंवा फार्म हाऊसमध्ये खुर्चीवर निवांत बसला आहात आणि समोर फुलांवर मस्त फुलपाखरे बागडत आहेत किती छान वाटेल ना… मग काय यासाठी विशेष मेहेनतीची गरज नाही. फुलपाखरांना दोन प्रकारची झाडे लागतात, एक म्हणजे नेक्टर प्लान्ट (मकरंद देणारी झुडपे) आणि दुसरी होस्ट प्लान्ट म्हणझेच त्यांना खाद्य देणाऱ्या वनस्पती. 

मकरंद देणारी झाडे – सदाफुली, घाणेरी, कॉसमॉस, झिनिया, स्नेकविड, कन्हेरी व्हरबीनो, टणटणी, तेरडा, रानमोगरा, आबोली, ब्लॉसम, झेंडू, लँटाना

खाद्य देणाऱ्या वनस्पती आणि वेली – कडीपत्ता, लिंबू, सोनचाफा, कृष्णकमळ, रुई, बदकवेल, सीताफळ, हळदीकुंकू, पानफुटी, विलायती चिंच, एरंड, आंबा, अशोक, वाघाटी  यांवर फुलपाखरे अंडी घालतात.

अंड्यामधून बाहेर येणारी अळी त्याच वनस्पती खाऊन मोठी होते. विशेषतः कडीपत्ता, लिंबाचे झाड बागेत असेल तर त्याच्या पानामागे आपल्याला अनेकदा छोट्या आकारातील रंगीत ठिपके किंवा अगदी छोटेसे गोळे चिकटलेले दिसतात. काही वेळा पान कुरतडलेलीही असतात. पानाला कीड लागली असे समजून काही जण ती पाने तोडूनही टाकतात, प्रत्यक्षात ती फुलपाखरांची अंडी किंवा अळ्यांनी ती पाने खाल्लेली असतात. सुरक्षित राहिलेल्या या अंड्यामधून काही दिवसांनी अळ्या बाहेर पडतात आणि पाने खाऊन ती मोठी होते. थोडे दिवसात अळीचा कोष होतो आणि एका सुंदर फुलपाखराचा जन्म होतो.

बागेत येणाऱ्या फुलपाखरांचे तुम्हाला संगोपन करावे लागणार नाही. तुम्ही त्यांना घर आणि अन्न देत आहात, ती स्वतःच त्यांची बाकीची काळजी घेतली. अनेक वनस्पतीप्रेमींनी त्यांच्या बागेत आलेल्या फुलपाखरांचा अंडी ते फुलपाखरू या सर्व टप्प्यांचे निरीक्षण करून फोटोही काढले आहेत. तुम्हाला ही अनुभव घेता येईल.

पावसाळ्याचा हंगाम सुरू झालाय, नवीन झाडांची लागवड करत असाल तर मग फुलपाखरांना लक्षात ठेवा बर का…. आपल्याकडे प्रामुख्याने दिसणारी काही फुलपाखरे – कॉमन मॉरमॉन Common Mormon, कॉमन ग्रास येलो Common Grass Yellow, ग्रास येलो Grass Yellow, प्लेन टायगर Plain Tiger, कॉमन क्रो Common Crow, टॉनी कोस्टर Tawny Coster, कॉमन बेरॉन Common Baron, कॉमन कॅस्टर Common Castor, ब्लू मॉरमॉन Blue Mormon (महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू), कॉमन रोझ Common Rose, ब्लू पॅन्झी Blue Pansy, ब्लू टायगर Blue Tiger.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

1 Comment

  • Swanand
    Posted June 26, 2023 9:50 am 0Likes

    सुंदर लेख. भारतात अनेक ठिकाणी अशी फुलपाखरू उद्याने आहेत. त्यातील एक प्रसिद्ध
    उद्यान तर पुण्यात आहे. अरणेश्र्वर जवळ papilon फुलपाखरू उद्यान हे खाद्य वनस्पती आणि फुलझाडे यांचे सुंदर मिश्रण आहे.

Leave a comment

error: Content is protected !!