संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक आणि धार्मिक वैशिष्ट्य मानले जाते. या अनोख्या सोहळ्याच्या निमित्त शनिवार दिनांक १७ जून २०२३ ला बायोस्फिअर्स संस्था Biospheres Pune, क्षितिज फाऊंडेशन आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने “सुवर्ण पिंपळ आणि देशी बीज प्रसाद अभियान” राबविण्यात आले.
जेजुरी ते वाल्हा दरम्यान आषाढ वारीत उपस्थित वारकरी संप्रदायास हे बीज वाटण्यात आले. सदर अभियानात संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे औचित्य साधून सुवर्ण पिंपळ व देशी वनस्पती बीज प्रसाद देशातील हिरवाई वाढावी, या वारसा वृक्षाचे जतन – संवर्धन व्हावं, जनमानसात सकारात्मक भाव यावा या उद्देशाने हे बीज माऊली हरित अभियाना अंतर्गत सर्वदूर करण्यात येत आहे. सदर बीज हे आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. ते उपलब्धतेनुसार संकलित करून बीज प्रसाद म्हणून वाटत आहोत. जेणेकरून नागरिकांनी- वारकऱ्यांनी जास्तीत जास्त ठिकाणी या बीजापासून रोपांची निर्मिती करावी. तसेच पंढरीच्या वारी दरम्यान वारीच्या वाटेवर हे बीज सर्वदूर करावं असं उद्देश या अभियानाचा आहे.
हेही वाचा: GRAY-THROATED MARTIN या पक्ष्याची जळगाव जिल्ह्यात प्रथमच नोंद
वृक्षारोपण हे भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून वृक्षारोपण – बीजारोपण हे लोकसहभागातून होऊन त्याद्वारे पर्यावरण रक्षणाचे कार्य केले जावे असा उद्देश या अभियानाचा आहे. आपल्या देशात प्रत्येक झाडाचे सांस्कृतिक महत्व जाणून पूजा केली जात असे. यामागे शास्त्रशुद्ध चिंतन व दूरगामी विचार होता. परकीय आक्रमणाच्या काळात शास्त्रीय विचार मागे पडून केवळ रूढी उरल्या. त्यामुळे प्रत्येक झाडाचे शास्त्रीय व अध्यात्मिक महत्व समजून त्याचे वृक्षारोपण केले जावे अशी अपेक्षा या अभियानाची आहे.
श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी येथे प्रवेश केल्यानंतर उजव्याबाजूला पुरातन काळापासून उभे असलेले पिंपळाचे (अश्वत्थ) झाड आहे त्याला “सुवर्ण पिंपळ” असे संबोधले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्री रुक्मिणी माता यांनी या प्राचीन पिंपळास सव्वा लक्ष प्रदक्षिणा घातल्या होत्या. सदर पिंपळाचे रोपण हे श्री कुबेराने केले आहे अशी एक जनमान्यता आहे. श्री ज्ञानोबाराय आणि या वृक्षाचे देखील एक अलौकिक नातं आहे. माऊलींच्या जन्मापासून ते संजीवन समाधी पर्यंतच्या प्रवासाचा हा वृक्ष साक्षीदार आहे. माऊलींनी समाधिस्त होण्याआधी सुवर्णपिंपळाच्या पायाशी मस्तक ठेवून नमन केले होते, त्याचा कृपाशीर्वाद घेतला होता. असा हा भारत राष्ट्राचा अध्यात्मिक वारसा असलेला वृक्ष त्याच्या अध्यात्मिक, पर्यावरणीय तसेच औषधी गुणधर्मांनी सुपरिचित आहे.
सदर सुवर्णपिंपळ व इतर देशी वृक्षांच्या बीजाचे वाटप जेष्ठ नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, भा. ज. पा., आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनोद जी तावडे यांच्या शुभहस्ते व इतर मान्यवरांच्या आणि वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी डॉ. सचिन अनिल पुणेकर, श्रीपाद ढेकणे, श्रीमती तावडे, धनंजय जगताप, प्रसाद खंडागळे, विकास पासलकर, अभिषेक देशमुख, अमित जगताप, ओंकार मारणे, आदित्य जगताप व मोठ्या संखेने वारकरी संप्रदाय उपस्थित होता.
हेही वाचा: वणी जवळ सापडली विशालकाय डायनोसॉर ची जिवाष्मे
या प्रसंगी सुवर्ण पिंपळाविषयीच्या माहिती पत्रकाचे अनावरण देखील करण्यात आले. सुवर्ण पिंपळ आणि इतर देशी वृक्षांचे व वेलींचे (रक्तचंदन, बिब्बा, रिठा, आपटा, शिरीष, बेहडा, बीजा, गोकर्ण, पारिजातक) बीज आणि उपस्थित वारकरी संप्रदायास मोठ्या प्रमाणात वाटण्यात आले. सदर देशी बीज हे डॉ. महेंद्र घागरे, शैलेंद्र पटेल आणि डॉ. मधुकर बस्तावडे यांनी उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. सचिन पुणेकर: पर्यावरण शास्त्रज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष, बायोस्फिअर्स
९५०३०९६४६९ – biospheresorg@gmail.com
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.