रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ Fireflies
रात्रीच्या प्रकाशाचा अद्भूत खेळ Fireflies

मे महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जूनचा पहिला आठवडा जंगलामध्ये सेलिब्रेशनचा काळ असतो. हजारो काजवे Fireflies जंगलाच्या वेगवेगळ्या भागात रात्री एकाच वेळी रोषणाईचे खेळ खेळतात. तुम्ही सर्वांनी गाण्याच्या तालावर लुकलुकणारे दिवे पाहिले असतील. अगदी त्याचप्रमाणे काजवे लयबद्धरित्या एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाताना लुकलुकताना दिसतात. निसर्गाचा हा अद्भूत चमत्कार मानला जातो.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटामध्ये एका गाण्यात जंगलात लुकलुकणाऱ्या काजव्यांचे सुंदर दृश्य चित्रित करण्यात आले आहे. एका गाण्यामुळे काजव्यांना मोठीच लोकप्रियता मिळाली होती. योग्य हंगामात जंगलात रात्रीच्या वेळी गेलो, तर काजव्यांनी लुकलुकणारे आकाश हे दृश्य पहायला मिळते. हजारो काजवे जंगलात एकाच वेळी लुकलुकताना बघणे हा जणू नयनरम्य सोहळाच असतो. एरवी आपण कोकणात, गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये राहायला गेलो की रात्री घराजवळ किंवा रानावनात फिरताना काजवा डोळ्यासमोर पटकन उडत जातो. त्याला पकडायचे आणि डबीत ठेवायचे हा अनेक लहान मुलांचा छंद असतो. जंगलात काजवे महोत्सवाच्या वेळी संपूर्ण झाड काजव्यांनी बहरते. साधारणतः वळवाच्या पावसानंतर जंगलांमध्ये लुकलुकणाऱ्या काजव्यांचा नेत्रदीपक सोहळा अनुभवायला मिळतो.

हेही वाचा: पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा

निसर्गाचा चमत्कार

काजवा हा कणा नसलेला म्हणजेच अपृष्ठवंशीय गटातील कीटक आहे. जगभरात सुमारे दोन हजारांहून अधिक काजव्याचे प्रकार आढळतात. काजवे निशाचर असल्याने रात्रीच सक्रिय होतात. जैविक कचरा विघटन, परागीभवनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरते. दर वर्षी मे महिन्याचा शेवटचा आठवडा ते जूनचा पहिला आठवडा म्हणजेच पावसाळ्यापूर्वीचे दमट वातावारण हा काजव्यांच्या मिलनाचा काळ असतो. या काळात हजारो नर काजवे जोडीदाराच्या शोधात एकाच वेळी झाडांवर लयबद्ध पद्धतीने उडतात. या वेळी मादी काजवे जमिनीलगत बसून हा सोहळा बघतात. सर्वाधिक प्रकाशमान आणि लुकलुकणारा काजवा त्या जोडीदार म्हणून निवडतात. यानंतर मादी पाणथळ जागेमध्ये अंडी घालते आणि काजव्यांची पुढची पिढी जन्माला येते.

काजवे चमकतात कसे ?

काजव्यांमध्ये निर्माण होणारा प्रकाश हा रासायनिक प्रक्रियेतून होतो आणि तो जैविक प्रकारचा असतो. काजव्यांच्या पोटात मॅग्नेशियम, प्राणवायू, लुसिफेरस आणि लुसिफेरीन यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन प्रकाशनिर्मिती होते. मिलनाच्या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी ही प्रकाशनिर्मितीची कला निसर्गानि काजव्याला दिली आहे.

हेही वाचा: बिपरजॉय म्हणजे आपत्ती

काजव्यांची वसतिस्थाने

काजव्यांची राहण्याची आणि रात्री रोषणाई करण्याची झाडे ठरलेली आहेत. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा मुक्काम असतो. महाराष्ट्रात प्रामुख्याने पश्चिम घाटात काजवे दिसतात. नाशिकजवळ भंडारदरा, पांजरे, उडदावणे, कोलटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी भरून जातात. भीमाशंकरचा काही भाग, ताम्हिणी अभयारण्य राधानगरी अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या काही पट्ट्यांमध्ये काजव्यांचे संमेलन भरते.

काजवा महोत्सवाचेही आयोजन

काजव्यांचा हा प्रकाशमान सोहळा पर्यटकांना दाखविण्यासाठी भंडारदरा भागातील काही संस्थांनी काही वर्षांपूर्वी काजवा महोत्सव सुरू केला. या महोत्सवाला अमाप लोकप्रियता मिळाली. तेव्हापासून दर वर्षी हुरडा पार्टीसारखा काजवा महोत्सव सुरु झाला आहे. पर्यटकांची नुकती गर्दीच नाही, तर उपद्रवही वाढला आहे. अनेक लोक काजव्यांना बघताना मुद्दाम त्यांच्यावर बॅटरीचे झोत मारतात. गाडीचे दिवे त्यांच्या दिशेला फिरवतात. त्यामुळे काजव्यांचा थवा बिचकतो आणि कधी कधी उडण्याऐवजी लपून बसतात. तर काही काजवे या अनैसर्गिक प्रकाशाकडे आकर्षित होतात आणि जीव गमावतात. लोक जोरजोरात शिट्ट्या वाजवून जंगलातील शांतता नष्ट करतात. या बेशिस्त पर्यटकांना शिस्त लावण्यासाठी वन विभागाने आता अनेक नियम केले आहेत. पर्यटकांच्या संख्येवरही बंधने आणायचे ठरवले आहे. काजवा महोत्सव हा अद्भुत सोहळा आहे. त्याबद्दल कुतूहल असणे स्वाभाविक आहे. पण, आपणही निसर्गाचे नियम पाळले पाहिजेत, काजव्यांच्या हालचालींवर मर्यादा येणार नाहीत, हस्तक्षेप होणार नाही, याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!