पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा Red Velvet Mite Rain Bugs
पावसाळ्याचा निदर्शक मृग किडा Red Velvet Mite

ऋतूबदलाची चाहूल लागण्यासाठी निसर्गाने काही झाडे, फुले, पक्षी आणि अगदी कीटकांनाही जबाबदारी दिली आहे. हे घटक ठरलेल्या वेळी त्यांची कामे पूर्ण करतात. उदाहरणार्थ पावशा पक्ष्याची शीळ सुरू झाली की पावसाची नांदी, कावळा कोणत्या झाडावर घरटे बांधतोय त्यानुसार यंदाचा पाऊस किती पडतो याचे ठोकताळे ठरवले जातात. पावसाचा असाच अजून एक द्योतक (इंडिकेटर) म्हणजे मृग किड्याचे दिसणे.

पावसाची चाहूल लागली की रानावनात टेकड्यांवर जंगलामध्ये हे पिटुकले मखमली मृग किडे दिसायला लागतात. पूर्वी गावाकडच्या लहान मुलांमध्ये या किड्यांना पकडून घरी एका डबीमध्ये ठेवायची खूप क्रेझ होती. लालभडक रंगाचे हे मखमली किडे साधारणपणे मृग नक्षत्र सुरु झाले की, दिसायला लागतात. एरवी ते कुठे असतात असा प्रश्न अनेकांना पडतो.

हेही वाचा: बिपरजॉय म्हणजे आपत्ती

मृग किडा अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. काही माणसं त्याला गोसावी, साधु, मखमली किडा, बिभोती, बिर बाहोत किडा म्हणतात. विदर्भात तो राणी किडा या नावाने ओळखला जातो. इंग्रजीमध्ये या किड्यांना Red Velvet Mites, True Velvet Mites किंवा Rain Bugs ही नावे मिळाली आहेत. हा किडा आकाराने लहानसा असला तरी, त्याचे शास्त्रीय नाव ट्रॉबिडियम ग्रॅडिसिमम Trombidium Grandissimum असे लांबलचक आहे. मृग किडा दिसायला लागला की, शेतकऱ्यांना पावसाळ्याचे वेध लागतात. एरवी हे किडे जमिनीखाली सुप्तावस्थेत असतात. वळवाच्या पावसानंतर जमीन ओलसर होते. मातीतील आर्द्रता वाढते मग हे कीडे वर येतात. आपल्या देशात हा किडा सगळीकडे दिसतो. निरुपद्रवी, लाजाळू असे हे किडे कधी समूहाने कधी एकटेच फिरतात. या किड्यांचे मूळ कोळ्यांच्या जातीतले. इतर छोटे कीटक खाऊन ते जगतात. नर कीटकांपेक्षा मादी कीटक लहान असतो. सगळ्या मादी समूहाने अंडी घालतात. पावसाळा संपून थंडीला सुरुवात झाल्यावर किडे पुन्हा स्वतः ला जमिनीत गाडून घेतात. ग्रामीण भागात या किड्यांचे औषधी उपयोग असल्याचे सांगितले जाते. मलेरिया, पॅरालिसिस अशा आजारांसाठी बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक, आदिवासींच्या औषधांमध्ये या किड्याचा वापर केला जातो. प्रत्यक्षात संशोधकांच्या संशोधनामध्ये अजून या किड्याचा वैद्यकीय उपयोग सिद्ध झालेला नाही.

निसर्गाने या किड्याला सुंदर रंग आणि मखमली त्वचा दिली आहे. त्यामुळे हा किडा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो, एवढे मात्र नक्की. पूर्वी शहरांतील उद्याने, सोसायट्यांच्या आवारात देखील मृग किडा दिसायचा. अलीकडे बागांमध्ये झाडांवर केली जाणारी रासायनिक फवारणी, खतांच्या वापरामुळे हे कीडे शहरातील मनुष्यनिर्मित बागांमधून गायब झाले आहेत. टेकड्यांवर, रानावनात पायवाटांवर पावसाळ्यापूर्वी मात्र, हे किडे पटकन बघायला मिळतात.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment

error: Content is protected !!