थंडीची चाहूल लागली की बर्फात थ राहणारे विविध देशांतील पक्षी भारतात, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वास्तव्याला येतात. हे पक्षी दर वर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून त्यांना आवडलेल्या तलाव, माळरान किंवा जंगलात येतात. पण, ते वाट कशी चुकत नाहीत, याचा अभ्यास जगभरातील संशोधक करीत आहेत. या पक्ष्यांचा प्रवास कसा होतो, हे समजून घेण्यासाठी पक्ष्यांच्या पंखांवर अगदी हलक्या वजनाचा ट्रान्समीटर किंवा पायात बारीक रिंग घातली जाते.
जेजुरी जवळील पिंगोरी गावात इला फाउंडेशन Ela Foundation ही पर्यावरणासाठी कार्यरत संस्था आहे. संस्थेचे प्रमुख प्रसिद्ध पक्षितज्ज्ञ डॉ. सतीश पांडे आणि त्यांच्या टीमने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ब्लू रॉक थ्रश Blue Rock Thrush म्हणजेच कस्तूर या पक्ष्याच्या पायात रिंग घातली होती. या पक्ष्याची जोडी दरवर्षी हिवाळ्यात सलग पाच वर्षे केंद्राजवळील माळरानात फिरताना दिसत होती. दर वर्षी तोच पक्षी पुन्हा येतो की नवीन, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यातील एका कस्तूरच्या पायात रिंग घातली. विशेष म्हणजे पुढील पाच महिने हा पक्षी दिसला नाही. हिमालयातील पक्षी अभ्यासकांनी हा पक्षी दिसल्याची माहिती स्थलांतराचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांकडे नोंदवली. त्यानंतर हे कस्तूर महाशय थंडी सुरू झाल्यावर पुन्हा पिंगोरीमध्ये आले. थंडी संपल्यावर निघून गेले. या महिन्यात पुन्हा एकदा पायात रिंग असलेल्या त्या कस्तूरचे दर्शन झाले.
ब्लू रॉक थ्रश हा छोटासा पक्षी आहे. मैनेच्या आकाराएवढा… सायबेरियात बर्फ पडायला सुरुवात झाली की त्यांचा प्रवास सुरू होतो. हिमालयाच्या दक्षिण भागातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात. गुगलवर हे अंतर पाहिलं असता ते साडेचार हजार किलोमीटर असल्याचे दिसते. अवकाशातील अंतर वेगळ्या पद्दतीने मोजले जात असले तरी काही हजार किलोमीटरचा प्रवास या पक्षाला लक्षात कसा राहतो. त्याच्याकडे तर गुगल मॅपही नाही… मग कसा येत असेल हा पक्षी पुन्हा त्याच ठरलेल्या जागेवर, हे मोठं कोडंचं आहे.
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com