पांढरी चिप्पी ठरले राज्य कांदळवन वृक्ष Sonneratia alba : State Mangrove Tree
पांढरी चिप्पी ठरले राज्य कांदळवन वृक्ष Sonneratia alba : State Mangrove Tree

आंबा हा आपला राज्य वृक्ष, हरियाल हा राज्य पक्षी आणि शेकरू हा राज्य प्राणी होय. काही वर्षांपूर्वी निलवंत (ब्लू मॉरमॉन) या फुलपाखराला राज्याचे फुलपाखरू म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच, काही दिवसांपूर्वी आपल्या राज्याच्या वनमंत्र्यांनी पांढरी चिप्पी (सोनोरेशिया अल्बा – Sonneratia alba) या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष State Mangrove Tree म्हणून जाहीर केले आहे. एखाद्या कांदळवन प्रजातीला राज्य वृक्षाचा मान देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.

आपल्या राज्याच्या सागरी किनाऱ्यांवर सुंदर कांदळवनाची किनार लाभली आहे. या सागरी जंगलाला वाचविण्यासाठी वन विभागाचा कांदळवन कक्ष काम करत आहे. या कांदळवनात दिसणाऱ्या पांढऱ्या चिप्पी या कांदळवृक्षाला राज्यातील मानाचा दर्जा मिळाला पाहिजे, असा प्रस्ताव अभ्यासकांनी तयार केला होता. विशेष म्हणजे राज्याच्या वन्यजीव महामंडळाने या वृक्षाचे कौतुक करून त्याला राज्य कांदळवृक्षाचा बहमान दिला आहे. निसर्गरंगच्या एका अंकात आपला निसर्गमित्र देवेंद्र याने आपल्याला कांदळवन म्हणजे काय हे समजावून सांगितलेच आहे. जगभरात या कांदळवनाच्या साठ प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात या पैकी वीस प्रजाती दिसतात. राज्याच्या सागरी किनारपट्टीवर या प्रजाती बघायला मिळतात. पांढरी चिप्पी ही प्रजाती किनारपट्टीवर सगळीकडे आढळते. पांढऱ्या चिप्पीचे वैशिष्ट्य म्हणजे ती जमीन किंवा वाळू घट्ट धरून ठेवू शकते. या प्रजातीच्या मुळांमध्ये पाण्यातील प्रदूषण कमी करण्याचे कौशल्य असते. पांढऱ्या चिप्पीच्या फुलांवर मधमाशा आकर्षित होतात आणि तिथेच पोळे करतात. पांढरी चिप्पीमध्ये औषधी गुणधर्मही आहेत बरं का…

 

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

Leave a comment

error: Content is protected !!