निलेश चांदोरकर
संस्थापक
Brief info
मुलांना निसर्गाप्रती संवेदनशील करण्याच्या उद्देशाने निलेश चांदोरकर यांनी निसर्गरंग हे व्यासपीठ सुरु केले आहे. निलेश चांदोरकर गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. राज्यस्तरीय भाषिक वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. दैनिक तरुण भारत (बेळगाव), नवभारत, विजय कर्नाटक या लोकप्रिय वर्तमानपत्रांमधील अनुभवासोबत पुण्यातील नामवंत दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये तेरा वर्षे विविध प्रकल्पांच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. मुख्य व्यवस्थापक या पदाचा कार्यभार सांभाळताना डिजिटल मीडिया, टेलिव्हिजन, इव्हेंट मॅनेजमेंट या शाखाही हाताळल्या आहेत.
प्रकल्प संशोधन आणि नवीन प्रकल्पांचे नियोजन या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. साचेबद्ध कामात अडकून न राहता, स्वतःला काळाशी सुसंगत ठेवणे, स्वतःमध्ये बदल करत जाणे या स्वभावामुळेच निलेश यांनी गेल्या दोन दशकात अनेक वैविध्यपूर्ण प्रकल्पांची हाताळणी केली. नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वतःला आवडेल, नवनिर्मितीचा अनुभव घेता येईल आणि काळाची गरज असलेल्या प्रकल्पावर काम करण्याच्या हेतूने त्यांनी स्टार्टअपचा पर्याय निवडला. नोकरीच्या साचेबद्ध सेफ झोन मधून बाहेर पडून स्वतःच्या क्षमतांना विस्तारण्यास प्राधान्य दिले. यातूनच निसर्गरंग या व्यासपीठाची निर्मिती झाली.
जागतिक तापमान वाढ, हवामान बदल ही समस्या वैश्विक आहे. अनेक देश या संकटाला रोखण्यासाठी काम करत आहेत. यामध्ये तरुणांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे प्रयत्न सुरू आहेत. पर्यावरण शिक्षण हा यातील गाभा आहे. मुलांमध्ये निसर्गप्रेमाचे बीज रुजविण्यासाठी निलेश यांनी पुढाकार घेतला आहे. लहान मुलांवर निसर्ग वाचनाचे संस्कार घडविण्यासाठी निसर्गरंग काम करणार आहे. मुलांना निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल कुतूहल आहेच, त्यांच्या या जिज्ञासेला खत पाणी घालणार आहे. सर्व क्षेत्रातील संस्था, तज्ज्ञ व्यक्तींना निसर्गरंगच्या व्यासपीठावर एकत्र आणण्याचा निलेश यांचा मानस आहे.