निसर्गरंग का आणि कशासाठी?
निसर्गरंग हे खास लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेले व्यासपीठ आहे. मुलांमध्ये निसर्ग संवर्धनाचे बीज रुजविण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे.
काही वर्षांपूर्वीपर्यंत अभ्यासक, तज्ज्ञांच्या चर्चेपुरते मर्यादित असणारे जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, समुद्राची वाढती पातळी आदी विषय आता घरोघरी पोहोचले आहेत. पर्यावरण संरक्षणाबद्दल जग बोलत आहे. पण, पर्यावरण संरक्षणात सहभागी व्हायचे असेल, तर नेमकं काय करायचं असं विचारलं तर अनेकांना सांगता येत नाही. झाडं लावायची, पाणी वाचवायचं, प्रदूषण कमी करायचं…अशा गोष्टींचा आधार घेतला जातो. म्हणजे नेमकं काय करायचं, हे आपल्याला सांगता येत नाही. पुढच्या पिढीला पर्यावरणाप्रती संवेदनशील करण्यासाठी त्यांच्यावर बालपणी संस्कार झाल्यास भविष्यात ते अधिक जबाबदारीने निर्णय घेतील.
हीच गरज ओळखून आम्ही मुलांना केंद्रस्थानी ठेवून पर्यावऱण शिक्षणाचा आधुनिक मार्ग स्वीकारला आहे. आजी-आजोबांनी लहानपणी सांगितलेल्या गोष्टी आपण कितीही मोठे झालो, तरी लक्षात राहतात. किंबहुना आपण त्या अधिक फुलवून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवतो. अगदी त्याच पद्धतीने आम्ही सहज सोप्या भाषेतून पर्यावरणाचे अंतरंग मुलांपर्यंत पोहोचविणार आहोत. जंगल, प्राणी, पक्षी, किडे, मुंग्या, पाऊस, पाणी, समुद्राशी निगडीत रंजक आणि शास्त्रीय माहिती मुलांना मराठी भाषेतून वाचायला मिळणार आहे.