ऑक्टोपस : तीन हृदयांचा प्राणी - निसर्ग रंग
ऑक्टोपस : तीन हृदयांचा प्राणी

निसर्गाने निर्माण केलेल्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे ऑक्टोपस हा प्राणी. कारण या प्राण्याला निसर्गाने एक दोन नाही तर तीन हृदय दिली आहेत. त्यामुळे माणसाला नेहमीच या प्राण्याचा हेवा वाटत आला आहे. जपान, चीन, इटलीमध्ये लोक या प्राण्याला चवचीवने खातात हे देखील खरयं.

ऑक्टोपस हा प्राणी समुद्रात राहणारा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याला शास्त्रीय भाषेत ‘ऑक्टोपस व्हल्गरिस’ म्हणतात. जगभरात ऑक्टोपसच्या शंभरहून अधिक प्रकारच्या जाती आढळतात. काही वर्षांपूर्वी फूटबॉल वर्ल्डकपमध्ये काही संस्थांनी भविष्य सांगणारा ऑक्टोपस स्टेडिअमच्या आवारात आणला होता. वेगवेगळ्या चॅनेल आणि वृत्तपत्रांनी त्याच्या बातम्याही केल्या होत्या. ऑक्टोपस दिसायला आकार नसलेला प्राणी असला तरी गेल्या काही वर्षात कार्टुनमुळे मुलांमध्ये ऑक्टोपस फेमस झाला. त्यामुळे फिश टँकच्या चित्रामध्ये अलीकडे मुले माशांबरोबर ऑक्टोपसचही चित्र काढतात.

खरं तर आकार ना उकार असलेला हा प्राणी; पण निसर्गानं किती अद्‌‌भूत वैशिष्ट्यं त्याला दिली आहेत. ऑक्टोपसला तीन हृदयं जशी असतात, तसे त्याला आठ हातही असतात. ऑक्टोपसची मादी एका वेळी दोन लाखांहून अधिक अंडी घालते.

समुद्राच्या तळाशी कपारीत तो एखाद्या गोळ्या प्रमाणे लपून बसतो. भक्ष्य जवळ येईपर्यंत त्याला आपण कोणाशिजारी भिरभिरत आहोत, हे कळत नाही. झडप घातल्याप्रमाणे ऑक्टोपस भक्ष्याला त्याच्या हातांमध्ये घट्ट पकडतो. ऑक्टोपसला खेकडे, कोळंबी, लॉबस्टर्स खूप आवडतात. कधी कधी ऑक्टोपस छोटा शार्क, डॉल्फिनची शिकारही करतो.

ऑक्टोपसचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाने त्यांना रंग बदलण्याची शैलीही दिली आहे. सरड्याप्रमाणे तो रंग बदलत असतो.

भन्नाट गोष्ट म्हणजे, कधी कधी हे साहेब, एखादा शिकारी त्याच्या मागे लागले तर तोंडातून शाईसारखी काळसर निळ्या रंगाची लाळ पाण्यात सोडतात. त्यामुळे शिकारी अर्ध्यावाटेतून मागे फिरतो. स्वतःचा जीव वाचवताना त्याचा हात तुटला तरी पालीच्या शेपटीप्रमाणे पुन्हा उगवतो. वाइट म्हणजे, गेल्या काही वर्षात या प्राण्याची शिकारही खूप वाढली आहे.

टीम निसर्गरंग

Leave a comment